जेऊरच्या नुकसानग्रस्त मेंढपाळांच्या मदतीसाठी प्रयत्नशील : राज्यमंत्री दत्तामामा भरणे

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – जेऊर (ता.पुरंदर) येथील मेंढपाळांचे सुमारे ३०० मेंढ्या दगावल्याने त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून त्याकरिता अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासनस्तरावर मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी नुकसानग्रस्त मेंढपाळांना दिले.

पुरंंदरच्या दक्षिण भागातील २०० मेंढ्यांचा मृत्यू’ झाला याबाबत पोलीसनामा च्या वृताची दखल घेत सोमवारी (दि.१३) संध्याकाळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी  जेऊर येथील मेंढपाळांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, लक्ष्मण गोफणे, माणिकराव चोरमले, पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत, प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शितलकुमार मुकणे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाते, तालुका पशुसंवर्धन अधिकारी शरद काठवडे यांच्यासह जेऊर, मांडकी, पिसुर्टी आदी भागातील ग्रामस्थ व मेंढपाळ उपस्थित होते.

यावेळी मेंढपाळ बाळू दुषंत जाधव, पांडुरंग मोटे, सुमन महादा मोटे, गेणबा बन्याबा मोटे आदी मेंढपाळांनी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्यापुढे गेल्या महिनाभरात जवळपास ३०० मेंढ्या देवीच्या रोगामुळे मुर्त्यूमुखी पडल्याने मेंढपाळांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून आमचेे जगणेच मुुश्किल झाले असल्याची व्यथा मांडली.

या पार्श्वभूमीवर देवी हा रोग जेऊरच्या परिसरात होऊ नये म्हणून जेऊर परिसरातील २० कि. मी. अंतरावरील सर्व मेंढ्या, बकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्याचे व मुर्त्यूमुखी पडलेल्या मेंढ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. तसेच एक महिन्यांपासून जेऊर येथे देवीची साथ आली असून, या करिता पशुसंवर्धन खात्याकडून गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची चौकशी करून संबंधिततांवर कारवाई केली जाईल असेही राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/