खासदाराला ‘सेल्फी’ पडला महागात !

जालंधर : वृत्तसंस्था – हल्ली ‘सेल्फी’ काढण्याचे पेव चांगलेच फोफावले आहे. छोटे मोठे कार्यक्रम असो किंवा कोणतेही उपक्रम, इतकंच काय कोणतेही कारण नसताना जो-तो ‘सेल्फी’ काढण्यासाठीच धडपडतोय. या सेल्फीच्या नादामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे, तर नाहक जीवही अनेकांनी गमावले आहेत. राजकीय क्षेत्रात तर ‘सेल्फी’ काढण्यास नेत्यांनाही आनंद होत असतो; पण या सेल्फीच्या नावावर कधी आणि कसा आपल्या खिशावर ‘दरोडा’ पडतो हे मात्र कळत नाही. असाच कटू अनुभव फतेहगढ साहिबमधील एका खासदाराला घ्यावा लागला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस खासदाराकडे सेल्फीसाठी आलेल्या चोरट्याने खासदारासह दहा नेत्यांची पाकिटे मारली आहे. डॉ. अमर सिंह असे या खासदाराचे नाव असून फतेहगढ साहिब लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहे. डॉ. सिंह हे नुकतेच निवडणूक जिंकल्याने त्यांच्या सत्कारानिमित्त एका हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तेव्हा अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी जमले होते. तेव्हा काही चोरांनी सिंह यांच्याजवळ सेल्फी काढण्याच्या बहाण्याने गेले, तेव्हा या चोरांनी त्यांचे पाकीट लंपास केले. सिंह यांच्यासह दहा जणांचे पाकीट चोरट्यांनी लांबवले. आमदारांचे पीए रामकृष्ण यांचे पाकीट मात्र यातून बचावले आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली असून चोरांचा शोध सुरू आहे.

You might also like