खा. उदयनराजेंचे आज पुण्यात ‘ठरणार’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन नवी मुंबईतील गणेश नाईक यांचे भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून सातारचे खासदार उदयनराजे हे आज पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला निर्णय घेणार आहेत. पुण्यात सोमवारी सकाळी ११ वाजता ते ही बैठक घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसा सुचक इशारा त्यांनी वारंवार दिला आहे. गेल्या महिन्यांत साताऱ्यात पूरपरिस्थती असताना उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन भाजपा प्रवेशाबाबत चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्षात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ही भेट असल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतरही खासदार अमोल कोल्हे तसेच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांना मनविण्याचा प्रयत्न केला होता.

भाजपाकडून उदयनराजे यांनी अगोदर खासदारकीचा राजीनामा द्यावा, त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी राजे यांच्यावर शिरवळ येथे एक गुन्हा दाखल आहे. त्यातील फिर्यादी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळेही राजे यांच्या भाजपामधील प्रवेशाला अडथळा येत आहे. उदयनराजे हे आज पुण्यात बैठक घेऊन नेमके काय करायचे, भाजपात जायचे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रहायचे याचा निर्णय घेणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –