धक्कादायक ! …म्हणून जावयाने ५ लाखाची सुपारी देऊन केला सासऱ्याचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – जिवंत असे प्रयत्न पत्नीच्या वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळत नसल्याने, नात-जावयाने पाच लाखाची सुपारी देऊन नव्वद वर्षीय सासऱ्याचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन नात-जावयास अटक केली आहे. हा प्रकार चाकण–शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडी (ता. खेड) येथील खांडेभराड वस्तीवर घडला.

आनंदा गणपती खांडेभराड (९०, रा. खांडेभराड वस्ती, कडाचीवाडी, ता. खेड) असे गळा आवळून खून झालेल्याचे नाव आहे. नात जावई वनाथ काळूराम पानसरे (रा. रोहकल, ता. खेड) याला अटक केली आहे. तसेच अशोक विष्णू खेडकर (वडमुखवडी) याला अटक केली असून अल्पवयीन ताब्यात घेतला आहे. गोल्या राठोड आणि मुन्ना मुसळे हे फरार आहेत. या प्रकरणी सुभाष आनंदा खांडेभराड ( ५१, सध्या रा. राजकमल सोसायटी, मेदनकरवाडी, मूळ रा. कडाचीवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ पानसरे हा सासू, पुतण्या आणि सुभाष खांडेभराड यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीमध्ये बहिणीच्या हिश्याची मागणी करत होता. त्या कारणावरून खांडेभराड यांच्याशी वारंवार भांडणे करून त्यांना दमदाटी करत होता. ही जमीन आनंदा खांडेभराड यांच्या नावावर होती. आनंदा हे जिवंत असल्यामुळे जमिनीची वाटणी करता येत नाही,असे खांडेभराड यांनी नवनाथ याला समजावून सांगितले होते. परंतु नवनाथ हा काही केल्या कोणाचेच ऐकत नव्हता. एक दिवस म्हाता-याकडेच पाहून घेतो, असा दमही त्याने खांडेभराड यांना दिला होता.

बुधवारी (दि. २२ मे) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आनंदा खांडेभराड हे त्यांच्या राहत्या घरी मयत स्थितीत मिळून आले. त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा असल्यामुळे त्यांचे नातजावई नवनाथ पानसरे यांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय आला. त्यानुसार चाकण पोलिसानी आनंदा याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यावेळी पत्नीच्या नावावर येणाऱ्या जमिनीच्या हिस्सासाठी सासऱ्याचा खून करण्यासाठी अशोक खेडकर आणि त्याच्या साथीदारांना पाच लाखाची सुपारी दिल्याचे कबूल केले.

चाकणचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या पथकाने तपास करुन दोघाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही कबुली दिली. आरोपीनी गळा आवळून खून केला आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.