पोलिसांच्या ताब्यातून २ आरोपींचे पलायन, दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – एका गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन राहुरी तालुक्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना धक्का देऊन दोन आरोपी बेडीसह पळाले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पांचाळ हे जखमी झाले आहेत. काल सायंकाळी राहुरी तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्याने राजेंद्र बन्सी वारे (रा. पळशी, ता. पारनेर), अविनाश वामन मधे (रा. पोखरी, पारनेर) यांना अटक केलेली आहे. एका गुन्ह्याचा तपास करताना त्यांना काल सायंकाळी राहुरी तालुक्यातील आग्रेवाडी येथे आणण्यात आले होते. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वारे व मधे या दोघांना घेऊन पोलिस पथक घेऊन डोंगराळ भागात गेले. डोंगराळ भागात गेल्यानंतर त्यांनी पोलीस पथकाला धक्का दिला व हातातील बेडीसह पळ काढला. आरोपी पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पाठलाग करणाऱ्या पोलिस पथकावर जोरदार दगडफेक केली.

या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक पांचाळ यांच्या पायाला दुखापत होऊन ते जखमी झाले आहेत. दोघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. डोंगराळ परिस्थितीचा फायदा घेऊन ते पसार झाले. त्यामुळे मंचर पोलिसांना हात हलवत परतावे लागले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात राजेंद्र वारे व अविनाश मधे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे हे करीत आहेत.