‘त्या’ प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा : गृहनिर्माणमंत्र्यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चारा छावणी चालू न केल्याने नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. यात प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो, असा आरोप गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असेही सांगितले.

नगर तालुक्यातील बंद केलेल्या छावण्या पुन्हा चालू कराव्या यासाठी शिवसेनेने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन चालू केले होते. छावण्या चालू करण्याबाबत सरकारशी चर्चा करून लवकरच छावण्या चालू करू, असे आश्वासन दिले होते. या घटनेला दोन दिवस होऊनही चारा छावण्या चालू होत नसल्यामुळे आज पहाटेच्या सुमारास नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत झरेकर यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी ठपका प्रशासनावर ठेवत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. यादरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, प्रशासनाचा हलगर्जीपणा या घटनेतून स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये तोडगा काढला जाईल. मयत शेतकरी वसंत झरेकर यांना शासनाकडून आर्थिक मदतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सरकार नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like