जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्‍ह्यामध्‍ये सप्‍टेंबर2018 अखेर पडलेला पाऊस सरासरीच्‍या तुलनेत कमी असल्‍याने तसेच यापुढील कालावधीमध्‍ये पावसाची अशाश्‍वती निर्माण झाल्‍याने जिल्‍हयामध्‍ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

चाऱ्याची पळवापळवी होऊन त्‍यातून मोठया प्रमाणात कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणीबाणीच्‍या प्रकरणी संबंधीतांवर नोटीस बजावणे शक्‍य नाही. जिल्‍हयामध्‍ये शिल्‍लक असलेला चारा इतर जिल्‍हयात जाऊ नये व त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्‍हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अहमदनगर जिल्‍हयातून जिल्‍हयाबाहेर चारा वाहतूक करु नये असे आदेश निर्ममित करण्‍यात आले आहे.

सदरचा आदेश निर्गमित झाल्‍यापासून दोन महिन्‍याच्‍या कालावधीसाठी अंमलात राहील असे ही एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविण्‍यात आले आहे.