अहमदनगर: आंदोलनाच्या इशाऱ्याने मनपा प्रशासन नरमलं, माळीवाड्यातील कचरा रॅम्प बंद

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या माळीवाड्यातील कचरा रॅम्प तातडीने न हटविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे व दत्ता कावरे आदींनी महापालिका प्रशासानास दिला. त्यानंतर रॅम्प बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यापुढे कचरा संकलन करून वाहने थेट कचरा डेपो जातील, असे आश्वासन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिले आहे.

कचरा रॅम्पवर हजारो टन कचरा एका वाहनातून दुसर्‍या वाहनातून टाकला जातो. तर अनेक वेळा कचरा रॅम्प परिसरातच कचरा पडून असतो. या परिसरात दाट लोकवस्ती आहे. रॅम्पला लागूनच विद्यार्थ्यांची शाळा आहे. या रॅम्पमुळे स्थानिक नागरिक, हजारो शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तेथील कचरा डेपो तातडीने दुसरीकडे हटविण्यात यावा, या मागणीसाठी स्थानिक नगरकसेवकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासानाकडे निवेदन देऊन मागणी केलेली होती. नगरसेवक बोराटे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी माळीवाड्यातील कचरा रॅम्प हटविण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला. माजी महापौर सुरेखा कदम यांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. मनपाने दोन महिन्यात रॅम्प बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही महापालिकेकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

आज सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरु असल्याने व शाळेच्या दारात कचरा गाड्या लावल्याने नगरसेवकांनी थेट महापालिकेत येवून जाब विचारला. शुक्रवारपासून रॅम्प बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर उपायुक्त सुनील पवार, डॉ. बोरगे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी तातडीने माळीवाड्यातील कचरा रॅम्पला भेट दिली व पाहणी केली. उद्यापासून रॅम्प बंद करून कचरा गाड्या थेट सावेडी कचरा डेपोत जातील व तेथे कचरा खाली होईल, असे आश्वासन डॉ. अनिल बोरगे यांनी दिले.