भाजपाच्या निवडून आलेल्या खासदारास काँग्रेसच्या ‘या’ जिल्हाध्यक्षाने दिले १.२५ लाखांचे लीड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे आल्यानंतर सत्तार त्यांनी दानवे यांचा एक लाख मतांनी पराभव करण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी भाजपाच्या दानवेंना पाठिंबा देत आपल्याच मतदारसंघातून दानवेंना तब्बल १ लाख २४ हजार ८१३ मतांचे लीड मिळवून दिले. तर या मतदारसंघातून काँग्रेसच्या विलास औताडे यांना ४४ हजार ९८८ मते मिळाली.

जालना लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघापैकी सिल्लोडमध्ये दानवेंना सर्वाधिक मते मिळाली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर दानवे यांचा एक लाख मतांनी पराभव केल्याशिवाय डोक्यावरील केस वाढवणार नाही, असा संकल्प सत्तार यांनी केला होता. तेव्हापासून मागील साडेचार वर्षे त्यांनी टक्कल ठेवत गांधी टोपी घातली होती. आता सत्तार यांनीच दानवेंना मदत केल्यामुळे सत्तार आता केस वाढवणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

अब्दुल सत्तार यांनी मागील साडेचार वर्षात जिल्ह्यात काँग्रेसला संजिवनी देत उभे केले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी सत्तार यांची मागणी होती. मात्र, औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. झांबड यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व पक्षश्रेष्ठींनी कायम ठेवल्याने सत्तार यांनी नाराजी व्यक्‍त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. याचा फायदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झाला.