आरोग्य अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्त ‘मेहरबान’ ! जेथून निलंबित केलं तिथेच केलं पुन्हा ‘हजर’, प्रशासनाची भूमिका ‘संशयास्पद’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विविध गंभीर आक्षेपामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले होते. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी पैठणकर यांच्यावर उदार होऊन त्यांना ज्या विभागात कार्यरत असताना निलंबित केले, पुन्हा त्याच विभागात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त भालसिंग यांच्या मान्यतेने उपायुक्तांनी पैठणकप यांना कर्तव्यावर हजर राहण्याचा आदेश आज बजावला आहे. आयुक्तांची ही उदारता आता संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.

पैठणकर यांनी कामात अक्षम्य हलगर्जीपणा, कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या आधीचा आदेशाचा अवमान करणे, महापालिकेचे आर्थिक नुकसान करणे, गैरवर्तन आदी गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवून तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निलंबित केले होते. पैठणकर यांनी पुन्हा कर्तव्यावर हजर करून घेण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे विनंती केली होती. त्या अर्जानुसार आयुक्तांनी पैठणकर यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करून घेण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार उपायुक्तांनी आज पैठणकर यांना पुन्हा घनकचरा विभागातच हजर राबण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांची ही उदारता संशयास्पद आहे. ज्या पैठणकरवर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवून निलंबित केले आहे, त्या पैठणकर यांना दुसऱ्या विभागात रुजू करून घेण्याऐवजी पुन्हा त्यात विभागात रुजू करून घेणे म्हणजे संशयास्पद आहे. त्यांना दुसऱ्या ठिकाणी रुजू केले असते, तर एकवेळ समजण्यासारखे होते. परंतु चौकशी पूर्ण होण्याअगोदरच या विभागात हजर करून घेणे म्हणजे त्यांना पुरावा नष्ट करण्यास मदत करण्यासारखे आहे. गंभीर स्वरूपाच्या आरोपाच्या व्यक्तीला, त्याच विभागात रुजू करून घेण्याचा प्रकारामुळे आता आयुक्तच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. आयुक्तांच्या या भूमिकेवरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –