सीना नदी पुलाचे ‘मृतात्मा पूल’नामकरण, जागरुक नागरीक मंचचे अनोखे आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  अर्धवट काम झालेल्या पुलामुळे निष्कारण कायनेटिक चौकातून लांबून जाण्याचा हेलपाटा पडत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचा, ठेकेदाराचा व या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांचा निषेध करण्यासाठी जागरुक नागरीक मंचने आंदोलन करत या पुलाचे नाव ‘मृतात्मा पूल’ केले असून, पितृपक्ष चालू असल्याने या पुलाचे चौथे वर्षश्राद्ध घातले आहे.

नगरच्या रेल्वे स्टेशनला सर्वात स्वच्छ व सुंदर स्टेशनचा राष्ट्रीय स्तरावरील बहुमान मिळाला. मात्र या स्टेशनला व शहराला जोडणार्‍या सीना नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून कासव गतीने चालू आहे. जेवढे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झालेले दिसते. पुलाच्या मार्गात आडव्या येणार्‍या डि.पी. हलविण्यासाठी वारंवार निवेदने व आदेशही दिले गेले, मात्र महावितरणचे अधिकारीही झोपलेले आहेत. 7 कोटी रुपये खर्चुनही अपुर्ण असलेल्या या पुलाच्या कामात लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी यांनी कमिशन खाल्ले असल्यानेच गप्प आहेत. संबंधित ठेकेदारही काळ्या यादीत आहेच. पण याच स्टेशन परिसरात सहा नगरसेवक, चार माजी महापौर, उपमहापौर, भाजपचे आमदारकी लढविणारे नेते एवढे नव्हे तर मनपाचे उपायुक्त देखील राहतात. परंतु गेल्या चार वर्षापासून एकानेही या पुलाबाबत तोंडातून शद्ब काढलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांना या अर्धवट काम झालेल्या पुलामुळे निष्कारण कायनेटिक चौकातून लांबून जाण्याचा हेलपाटा पडत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचा, ठेकेदाराचा व या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांचा निषेध करण्यासाठी जागरुक नागरीक मंचने आंदोलन करत या पुलाचे नाव ‘मृतात्मा पूल’ केले असून, पितृपक्ष चालू असल्याने या पुलाचे चौथे वर्षश्राद्ध घातले आहे, असे प्रतिपादन जागरुक नागरीक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांनी केले.

नगर रेल्वे स्टेशन रोडवरील ऐतिहासिक लोखंडी पुला शेजारील पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडल्याच्या निषेधार्थ जागरुक नागरीक मंचने अनोखे आंदोलन करत या पुलाचे नामकरण ‘मृतात्मा पूल’चे चौथे वर्षश्राद्ध असा फलक रस्त्याच्या मधे येणार्‍या डिपीवर लावून चपलेचा हार घालून अनोखे आंदोलन केले. येथे लावलेल्या फलकावर ‘बथ्थड मेंदूची मनपा, पुलाच्या कामाचा ठेकेदार व एमएसईबीचा जाहीर निषेध!’ चार वर्षात लाईटची डिपी हलवणे जमले नसल्याने या पुलावरुन जातांना डिपीला धडकून मरणार्‍यांची शेजारीच्या अमरधामात सोय केली आहे, असा मजकूर लिहिला आहे.

या आंदोलनानंतरही जर प्रशासन जागे होवून वाहतुकीसाठी 15 दिवसांत पूल खुला न केल्यास महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या गळ्यात चपल्यांचे हार घालू, असा इशारा सुहास मुळे यांनी दिला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.सुनिल पंडित, डॉ.दरेकर, हरिभाऊ डोळसे आदिंनी मत व्यक्त केली. या आंदोलनास जागरुक नागरीक मंचचे कैलास दळवी, जय मुनोत, प्रमोद मोहोळे, भैरु खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, हेमंत थोरात, दत्ता गायकवाड, डॉ.केवळ, विष्णू सामल, देवीदास अकोलकर, सुरेश घोडेकर आदि उपस्थित होेते.