रोहित पवार यांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू ; खा. सुजय विखे यांचा बारामतीकरांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू. ती जबाबदारी माझी आहे, असा इशारा खा. सुजय विखे यांनी बारामतीच्या पवार कुटुंबियांना दिला आहे.

विखे म्हणाले की, पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू.

कर्जत येथील सत्कार समारंभात डाॅ. विखे यांनी पवार कुटुंबियांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून इतिहास घडवून दाखवू. या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेल्या रोहित पवार यांची अवस्था मावळमधून लोकसभा आलेल्या पार्थ पवार यांचे पेक्षाही वाईट करून दाखवू. पालकमंत्री शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारीच माझी आहे.

महायुतीतील सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केल्याने मी उच्चांकी मतांनी निवडून आलो. माझ्या पराजयासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या शेजाऱ्यांना ताकद दाखवून दिलीच आहे. विधानसभा निवडणुकीत ती अधिक दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.