भाजपच्या माजी मंत्र्यांचे निकटवर्तीय, माजी नगराध्यक्षाचे पती वाळूतस्करीत ! राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय व माजी नगराध्यक्षांचे पती एम. डी. शिंदे हे वाळूतस्करीत अडकले आहेत. घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणारी वाहने पोलिसांनी पकडली. त्यात शिंदे यांची पोकलेन मशीन आहे. या मशीनवर कारवाई करू नये, यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीने पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘एसपीं’च्या आदेशाने झालेल्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाने दबाव झुगारून टाकला.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील घोड नदी पात्रात बेकायदा वाळू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यावरून एस. पी. सिंधू यांनी कारवाईचे आदेश दिले. श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने घोड नदीपात्रात छापा टाकला. या छाप्यात एक पोकलेन मशीन, एक जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकासह पोकलेन, जेसीबी व ट्रॅक्टरच्या मालकाविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत. यातील पोकलेन मशीनचा मालक एम. डी. शिंदे हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा निकटवर्तीय आहे. शिंदे याची पत्नी सुनीता शिंदे या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होत्या.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना उमेदवारी दिल्याने संतापलेल्या मनोहर पोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे या काँग्रेसकडून उमेदवारी करून थेट नगराध्यक्ष निवडूनही आल्या. शिंदे यांच्यासाठी पाचपुते यांनी नगराध्यक्षपदी निवडून येईल, अशा उमेदवाराला उमेदवारीस नकार दिला होता. नगराध्यक्षपदी निवडून आल्यास पाचपुतेंनी उमेदवारी नाकारून निकटवर्तीय एम. डी. शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. आता त्याच एम. डी. शिंदे यांचा पाचपुते यांच्या काष्टी गावातच वाळूतस्करीत सहभाग आढळून आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांची ही कारवाई चर्चेची ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –