लोकन्यायालयात तडजोडीतून 22 कोटींची वसुली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  लोकन्यायालयात पक्षकार, न्यायाधीश, वकील व कर्मचारी यांनी एकत्रित प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटतील, यासाठी जेवढा प्रयत्न करायला हवा. लोकन्यायालयाद्वारे जास्तीत जास्त खटले मिटून आपापसातील वाद मिटवून संबंध सुदृढ व्हावेत, हीच लोकन्यायालयाद्वारे अपेक्षा असते. समाजात आनंदाचे व बंधुभावाचे वातावरण लोकन्यायालयामुळे निर्माण होते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विधीसेवा प्राधिकरणाच्या जनजागृतीच्या ‘नालसा’ गीताने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुजितजीत पाटील, सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. शेखर दरंदले, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, अधिक्षक रमेश नगरकर आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, वकील व पक्षकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तडजोडीतून एकूण 22 कोटी 24 लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

लोकअदालत संदर्भात विविध समित्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या समित्यामधील न्यायिक अधिका-यांचे लोकन्यायालय यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटलेल्या प्रकरणांत एकूण वसुल रक्कम २२,२४,४१,२७४/- (अक्षरी-बावीस कोटी चोवीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे चौ-हात्तर रुपये मात्र) एवढी झालेली आहे. सदर लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयामधील खटलापूर्व व दाखल प्रकरणे असे मिळून एकूण २८४७ इतकी प्रकरणे निकाली निघाली.

न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे म्हणाले, लोकन्यायालया द्वारे जास्तीत जास्त प्रकरणे मिटली जात आहेत. त्यामुळे न्यायालया वरील ताणतणाव कमी होत आहे, असे सांगून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव सुनीलजीत पाटील म्हणाले, पक्षकारायचा वेळ पैसा वाचून मोठी प्रलंबित खटले लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी लोकअदालत ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून काम करताना खटलापूर्व व प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी प्राधान्य देत आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी केले. आभार ॲड. भक्ती शिरसाठ यांनी मानले. या लोकन्यायालयास वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, ॲड. प्रसन्ना जोशी आदींसह मोठ्या संख्येने वकील व पक्षकार सहभागी झाले होते. जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ, बँक अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, विजवितरण कंपनी अधिकारी, विधि स्वयंसेवक, प्रबंधक, जिल्हा न्यायालय व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You might also like