अभियंत्यांवर बूट फेकल्याचे प्रकरण : तोडगा निघेना, मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

सहा दिवसांपासून कामकाज ठप्पच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी. गुन्ह्यात आरोपी असलेल्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवून त्याची प्रत युनियनला द्यावी आदी मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन आजही सुरूच ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज सलग सहा दिवसांपासून ठप्प झाले आहे.

बोल्हेगाव येथील बंद पडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासोबत चर्चा करताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, नगरसेवक व इतर कार्यकर्त्यांनी प्रभारी शहर अभियंता सोनटक्के यांना शिवीगाळ करून बूट फेकून मारला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह चार नगरसेवक व इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवक अशोक बडे व मदन आढाव यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह इतर नगरसेवक व कार्यकर्ते फरार आहेत. त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्या अटकेसाठी आयुक्त भालसिंग यांनी पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा करावी. तसेच अभियंत्यांवर बूट फेकल्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवून देण्यात यावा. सदर प्रस्तावाची प्रत युनियनला द्यावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी केली आहे.

सदर मागणीवर तोडगा निघाला नसल्याने आज गुरुवारीही महापालिकेचे कामकाज कर्मचाऱ्यांनी बंद ठेवले आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासनासमोरचा पेच वाढला आहे. शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर सलग दोन दिवस सुट्ट्या होत्या. त्यानंतर सोमवार व मंगळवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. बुधवारी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची सुट्टी होती. आज गुरुवारी ही काम बंद ठेवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. प्रशासनही तोडगा काढू शकत नसल्यामुळे युनियन आणखी आक्रमक झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन सदर मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आयुक्तांकडून आश्वासन, पण ठोस कार्यवाही नाही
आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवून देऊ, असे आश्वासन दिले आहे. मात्र त्याबाबतची कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष कार्यवाही केली नाही. त्यामुळेच युनियन अधिक आक्रमक झाली आहे.