आ. जगतापांच्या नेतृत्वाखाली मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

एका महिन्यात कचरा डेपो हलविण्याचे आयुक्तांचे आश्वासन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –सावेडी कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर सदर कचराडेपो एक महिन्यात इतरत्र हालविण्यात येईल असे लेखी आश्वासन महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आ.संग्राम जगताप यांना दिले आहे.

सावेडीच्या कचरा डेपोप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आज (दि.10) दुपारी महापालिका कार्यालयात आयुक्त दालनासमोर आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात गटनेते संपत बारस्कर, नगरसेविका दिपाली बारस्कर, विना चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, माजी शहराध्यक्ष माणिकराव विधाते,उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा.अरविंद शिंदे, बाळासाहेब बारस्कर, माजी उपमहापौर दिपक सुळ, अजिंक्य बोरकर, सतिष बारस्कर, संभाजी पवार, अमोल गाडे, शिवाजी चव्हाण, साहेबान जहागिरदार, वैभव ढाकणे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रशांत भालेराव, अविनाश घुले, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, सारंग पंधाडे यांच्यासह प्रभाग 1 व 2 मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, सावेडी या ठिकाणी कचर्‍यातून खत निर्मीती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु मागील सत्ताकाळात सत्ताधार्‍यांनी तेथे कचरा डेपो तयार केला. त्यांना माळीवाड्यातील कचरा रॅम्पही हलविता आला नाही. चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम त्यांनी शहरात केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सावेडीच्या या कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरेाग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील सत्ताधार्‍यांनी ठेकेदाराकडून आर्थिक देवाण-घेवाण केल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने बुरुडगाव तसेच सावेडी हे दोन्ही कचराडेपो शहराबाहेर10 कि.मी. लांब हलवावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पर्यायी जागेचा शोध सुरु- आयुक्त
या आंदोलनानंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी तेथे येवुन आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. सावेडीतील कचराडेपो हलविण्यासंदर्भात पर्यायी सरकारी जागेचा शोध सुरु असून लवकरच सदर जागा निश्चित करुन सावेडीचा कचराडेपो त्याठिकाणी हलविण्यता येईल असे लेखी आश्वासन यावेळी आयुक्त भालसिंग यांनी आ.संग्राम जगताप यांना दिले.