‘तळीरामां’ची चंगळ… बॉक्सच्या बॉक्स लांबवले तर जागेवरही आस्वाद

नांदेड : वृत्तसंस्था – मद्याची वाहतूक करणारा ट्रक कलंडल्याने रस्त्यावर पडलेल्या विदेशी दारूची खोकी लांबविताना काहींनी जागेवर बसूनच दारूचा आस्वाद घेतल्याची घटना मालेगाव -वसमत रोडवर घडली.

औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे विदेशी दारूचे खोके घेऊन जाणारा ट्रक कलंडताच मद्याची खोकी रस्त्यावर विखुरली. ही नामी संधी साधून अनेक तळीरामांनी दारूचे खोके लांबवले. मालेगाव – वसमत रोडवर गिरिजा नदी परिसरात एका वळणावर विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला. लोकांनी यावेळी दारूचे बॉक्स लंपास केले. काही जणांनी तर जागेवरच दारूचा आस्वाद घेतला.

सदर घटना पोलिस प्रशासनास कळताच याठिकाणी पोलिस कॉन्स्टेबल शेख मजाज, किशोर हुंडे, पोलिस मित्र सुनील एंगडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदरील लूट थांबवली. या ट्रकमध्ये सुमारे २५ ते ३० लाख रुपयांची दारू असल्याचे समजते. या ट्रकमध्ये किंगफिशर या विदेशी मद्याचे दीड हजार बॉक्स होते.