मायावती, योगींनंतर आता पंतप्रधान मोदींवरही कारवाई होणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत जातीयवादी, महिलांविषयी अश्लिल भाषा वापरणारे आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निवडणुक आयोगाने उचललेल्या पावलाचे देशभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणुक आयोग काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप होत असलेल्या व सर्वाेच्च न्यायालयाने फटारल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या निवडणुक आयोगाने सोमवारी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यात जातीयवादी विखारी प्रचार करुन प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल भाजपचे स्टार प्रचारक व उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी घातली. त्याचबरोबर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांना ४८ तासांची प्रचारबंदी घातली आहे. त्यांच्या बंदीची सुरुवात मंगळवारी सकाळी सुरु झाली.

त्यांच्याबरोबरच रामपूरमधील समाजवादी पक्षाचे उमेदवार आजमखान यांनी अभिनेत्री जयाप्रदा विषयी केलेल्या अभद्र टिप्पणीबद्दल त्यांच्यावरही ३ दिवस आणि मुसलमानांना धमकाविणाऱ्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर २ दिवस प्रचारबंदी लागू केली आहे.

निवडणुक आयोगाने उचलेल्या या पावलाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. निवडणुक आयोगाच्या या कारवाईने प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर वचक बसेल, असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.

निवडणुक आयोगाने सैनिकांचा किंवा लष्कराचा प्रचारात वापर करु नका, अशा सूचना दिल्या आहेत. औसा येथे झालेल्या सभेमध्ये बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहिता भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत केले होते. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे निवडणुक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुख्य निर्णय अधिकारी यांना अहवाल पाठविला आहे. राज्य निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आपली प्रतिक्रिया जोडून तो अहवाल निवडणुक आयोगाकडे पाठविला आहे, त्यावर आता निवडणुक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे.

ज्या प्रमाणे योगी, मायावती, आजमखान, मेनका गांधी यांना आचारसंहिता भंगाबाबत कारवाई केली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणुक आयोग कारवाई करणार का, याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

निवडणुक आयोगाने या चौघांवर ज्या प्रमाणे तातडीने कारवाई केली. तशीच तातडीने मोदी यांच्यावरही कारवाई व्हावी, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटू लागल्या आहेत.

निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही कारवाई केली अथवा त्यांना इशारा दिला तरी तो भाजपाला मोठा धक्का ठरणार आहे. संपूर्ण निवडणुक प्रचाराला मोठी कलाटणी बसणार असल्याने आता निवडणुक आयोग काय निर्णय घेते, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

You might also like