Video : “पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत याचे ‘गुढ’ अखेर उकलले”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात एकही पत्रकार परिषद का घेतली नाही. ते राहुल गांधीसमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान का स्वीकारत नाहीत?. रेडिओवरुनही ते एकतर्फी का संवाद साधत होते, याचे गुढ आता उकलले आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. मोदींनी विविध चॅनेल आणि वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखती या फिक्स होत्या, असा गंभीर आरोप काँग्रेस आणि विरोधकांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत बालाकोट एअर स्ट्राईक बाबत आणि १९८७ – ८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा आणि ई मेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन मोदींवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या संपूर्ण मुलाखतीचे कथानक आधीच तयार होते आणि त्यातील प्रश्नदेखील ठरवून विचारण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या मुलाखतीचा काही भागाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओद्वारे मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ पाहताना तिसऱ्या सेकंदाला व्हिडिओ पॉज केल्यावर या व्हायरल व्हिडिओत मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे. तसेच सवाल संख्या २७ असेही लिहिलेले दिसतेय. कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतायेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते. अशी टीका होत आहे.

यावर दिव्या स्पंदना यांनी म्हटले आहे की, आता देशाला कळले आहे की, मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत. असा टोलाही लगावला आहे.