महात्माजींच्या कर्मभूमीवर ‘हिंदु दहशतवादा’च्या उल्लेखाने जनता मोदींवर नाराज

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आयुष्यभर अंहिसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत येऊन तसेच गांधीजींना प्रात:स्मरणीय म्हणून गौरव करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू दहशतवादावरुन काँग्रेसवर टिका करण्यासाठी वर्ध्याची निवड केली. त्यामुळे महात्मा गांधी यांचे अनुयायी तसेच विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते मोदींवर नाराज झाले आहेत. भाजपमधील एक गटही मोदींनी चुकीच्या ठिकाणी हा विषय घेतल्याचे मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात करण्यासाठी महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा शहराची मोदी यांनी निवड केली. पाच वर्षे विकासाची भाषा बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत अधिक आक्रमक होत. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याची नवी चाल खेळली आहे. काँग्रेसचे सरकार असताना मालेगाव बॉम्बस्फोट व समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट हे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे उघड झाल्यावर तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला हिंदु दहशतवाद असे संबोधले होते. त्यावर गांधीजी, विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला आपल्या भाषणात प्राधान्य देणे चुकीचे असल्याचे अनेकांना वाटते.

आपल्या पाच वर्षाच्या कामगिरीवर नरेंद्र मोदी यांचा भर असेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, मोदी यांच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाल्याने भाजपच्या अनेकांना धक्का बसल्याचे या सभेनंतर जाणवत होते. त्यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळणे अनेकांना पसंत पडले नाही. विकासाचा मुद्दा बाजूला टाकून मोदी यांनी पाकिस्तान, पुलवामा, येथील दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या मुद्दांवरच अधिक भर देत काँग्रेसवर टिका केली.

पवारांवर टिका करण्याऐवजी विकास करुन दाखवा

शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाला भेट देऊन त्यांना आपले गुरु संबोधणारे नरेंद्र मोदी यांनी या सभेत त्यांच्यावरच जोरदार टिका केली. मात्र, ही टिकाही अनेकांना रुचली नाही. मोदी यांना पवारांवर टिका करुन त्यांना अधिक महत्व दिल्याचे भाजपच्याच कार्यकर्त्यांचे मत बनले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेतेही मोदीच्या भाषणावर टिका करु लागले आहेत. शरद पवार यांनी बारामतीत कसा विकास केला. हे मोदी यांनी स्वत: पाहिले आहे. मोदी यांना त्यांनी केलेल्या विकासावर बोलता येणार नाही म्हणून त्यांनी घराण्याला लक्ष्य केले. त्याऐवजी त्यांनी बारामतीचा विकास करायला शरद पवार यांना ५० वर्षे लागली आम्ही ५ वर्षात विकास करु असे सांगितले असते, तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.