विश्लेषणात्मक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं का केलं राजीव गांधींना ‘लक्ष्य’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी विराट युद्धनौकेचा वापर टॅक्सीसारखा केला होता, असे विधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशभरात एकच खळबळ उडवून दिली होती. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर व पर्यायाने काँग्रेसवर तोफ डागताना पंतप्रधानांनी राजीव गांधी यांना भष्टाचारी नंबर वन असे विशेषण दिले होते. त्यावर सर्वदूर टिका झाल्यानंतरही त्यांनी मोदी यांनी राजीव गांधी यांच्या या सुट्टीचा मुद्दा काढला. त्यामागे नेमके काय कारण असा प्रश्न सर्वसामान्यांना तसेच राजकीय नेत्यांना पडला आहे. मात्र, त्यामागे भाजपची एक पद्धतशीर स्टॅटेजी असल्याचे दिसून येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवाद हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठेवायचा आहे. त्या स्ट्रेटजीचा एक भाग म्हणून हे आरोप करण्यात येत आहे.

राहुल गांधी हे राफेल वरुन मोदींना चारही बाजूने घेरत आहेत. चौकीदार चोर है ही घोषणा आता अगदी खेडोपाड्यापर्यंत गेली आहे. त्याचबरोबर काँग्रेसची न्याय योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कॉंग्रेसकडून दरवर्षी २ लाख रोजगार देणार होता, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेषत: राहुल आणि प्रियंका यांनी त्यावर जोर दिला आहे. भाजप त्यामुळे बॅंक फुटवर जाताना दिसू लागला आहे.

पुलवामा हल्ल्याचा मतासाठी वापर केल्याने आता त्याचा खूप उपयोग होणार नाही. तो नवा मुद्दा राहिला नसल्याने शेवटच्या दोन टप्प्यात पुन्हा एकदा राष्ट्रवाद हा मुख्य मुद्दा बनविण्यासाठी व आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे ठसविण्यासाठी राजीव गांधी यांना भष्ट्राचारी नंबर वन म्हणणे व आता त्यांच्या विराट वारीचा मुद्दा जाणीवपूर्वक उकरुन काढण्यात आला.

राफेलवरील मुद्दा खोडून काढण्यासाठी बोफोर्सचा मुद्दा पुढे आणण्यात आला. त्यानंतर आम्हीच देशाच्या सरंक्षणाचे खरे रक्षक आहोत, हे जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी राजीव गांधी यांनी ३२ वर्षापूर्वी केलेल्या विराट युद्ध नौका प्रवासाचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी उचलला.

मोदी यांचे भाषण झाल्यानंतर काही वेळातच टीव्ही चॅनेलला त्यावेळचे राजीव गांधी, सोनिया गांधी, अमिताभ बच्चन व इतरांचे फोटो, वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, त्यावर प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेले व्यंगचित्र असा सर्व मालमसाला तातडीने उपलब्ध करुन दिला. इतका मोठा मालमसाला तयार मिळाल्यावर सर्वच चॅनेलने जणू काही आजच आपण हे शोधून काढले आहे, अशा पद्धतीने ते सादर करायला सुरुवात केली. सुमारे ३२ वर्षापूर्वी १९८७ सालच्या या घटनेची एकच बाजू सादर केली गेली.

इंटरनेटच्या जमान्यातील नव्या पिढीला यातील काहीही माहिती नाही. या नव मतदाराच्या मनात काँग्रेस हा गांधी परिवाराचा पक्ष आहे. तो त्यांच्यासाठी काहीही करेल, देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत होता. असे ठरविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
३२ वर्षापूर्वीच्या या घटनेबाबत विरोधी सूर उठेल, याची भाजपने शक्यता गृहीत धरली नव्हती. पण काही टिव्ही चॅनेलने विशेषत: भाजप व मोदींच्या छत्रछायेखाली नसलेल्या काही चॅनेलने त्यावेळी विराटवर असलेल्या नौदल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यातून मोदींचे आरोप खोटे असल्याचे दिसून आले. त्यात अ‍ॅडमिरल रामदास यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी खोटे सांगत असल्याचे जाहीर केल्याने भाजपची काहीशी गोची झाली आहे. भाजप समर्थक टीव्ही चॅनेलने अजूनही मोदी करीत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे दिसून आल्यानंतरही मोदींचे आरोप पहिल्याप्रमाणे अजूनही दाखविणे सुरु ठेवले आहे.

राष्ट्रवादाचा मक्ता केवळ आम्हीच घेतला असल्याचे व देशाची सुरक्षा आम्हीच राखू शकतो, हे तरुणाईवर ठसविण्यासाठी भाजपने राजीव गांधींवरील आरोपाची मालिका सुरु ठेवली आहे. त्यातून रोजगार व अन्य प्रश्न बाजूला टाकणे हेही भाजपचा हेतू होता. तोही साध्य झाला आहे.