निर्णय घेण्यास विलंब केल्याने आघाडीचे जागा वाटप रखडले

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशापूर्वी नेमके काय घडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन वर्षापासून डॉ. सुजय विखे नगरमधून निवडणुक लढविण्याची तयारी करत होते. मात्र, त्यावर निर्णय घेण्यास दोन्ही बाजूंनी विलंब केल्याने परिणामी ते भाजपामध्ये गेले. नगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे त्यासोबतच अमरावती, रावेर, ओरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णय न घेण्याच्या पद्धतीला सुजय विखे कंटाळून भाजपात कसे गेले याविषयीची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे.

सुजय राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा अजित पवार दौऱ्यावर होते. तर जयंत पाटील यांनी दोन दिवसात निर्णय घेऊ, थोडे थांबा, असे सांगितले. मात्र हे आपल्याला फिरवत तर नाहीत ना या विचाराने सुजय यांनी तेथून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. ते कळताच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमद पटेल यांना फोन करुन सांगितले की आम्ही सुजयला राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे करण्यास तयार आहोत. तेथून निरोप मुंबईत येईपर्यंत महाजन यांनी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले होते.

औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांची अदलाबदली करण्यास आपण तयार आहोत, असेही काँग्रेसने कळवले होते. मात्र तो निर्णय अंमलात आला नाही. तेव्हा राष्ट्रवादीने अमरावती व औरंगाबादची अदलाबदल करुन मागितली. मात्र त्यावर मंगळवारी रात्रीपर्यंत काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आले नाही. अमरावतीची जागा मुकूल वासनिक यांच्यासाठी आम्ही देतो, त्यांना निवडूनही आणू असा प्रस्ताव स्वत: खा. सुप्रिया सुळे यांनी दिला होता. वासनिक आणि अहमद पटेल यांच्यातही यावर चर्चा झाली होती पण त्यावर निर्णय घेण्यास काँग्रेसने वेळ लावला. त्याच काळात नवनीत कौर राणा जाऊन शरद पवारांना भेटल्या. तेव्हा आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, मात्र दोन दिवस वाट पहावी लागेल, काँग्रेसचा निरोप काय येतो ते पाहू असे त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र राणा पतीपत्नी आणि शरद पवार यांच्या बैठकीचा सूर ओळखून नवनीत राणा यांनी आपल्याला पवारांनी पाठिंबा देऊ केला असे जाहीर करुन टाकले आहे.

ही चर्चा चालू असताना औरंगाबादच्या बदल्यात आम्हाला उस्मानाबादची जागा शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी द्या, अशी मागणी काँग्रेसने केली. पण ती जागा जगजितसिंह राणा पाटील यांच्यासाठी सोडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. परिणामी त्या जागेचाही विषय मागे पडला. त्यामुळे आता औरंगाबाद आणि रावेरच्या जागेची अदलाबदल करु असा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. रावेरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तेथून काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिल्यास ती जागा जिंकण्याची शक्यता जास्त आहे असे सांगण्यात आले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांना तयारीला लागा असा संदेश प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे अद्यापही काही जागांची नावे जाहीर करता येत नाहीत असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही काँग्रेसच्या निर्णय न घेण्याचा व विलंब लावण्याच्या पवित्र्यामुळे अनेक जागांवरील उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागत आहे.