पवारांची ‘घराणेशाही’ मावळाने नाकारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथम नाकारलेली पण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टामुळे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. अजित पवार यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेल्या मावळ मध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी चारी मुड्या चित केले. बारामतीत सुप्रिया सुळे जितक्या मतांनी निवडून आल्या, त्यापेक्षा किती अधिक मतांच्या फरकांनी मावळने पार्थ यांचा पराभव करुन अजित पवार यांची घराणेशाही नाकारली आहे. अजित पवार यांनी खेळलेला जुगार त्यांच्या अंगाशी आला आहे.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठेरलेल्या मावळचा गड शिवसेनेने केवळ शाबूतच ठेवला नाही़ तर पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्य मिळविले. पार्थ पवार यांना केवळ कर्जत ला १ हजार ८५० मतांची आघाडी मिळाली. हे वगळता बाकी पाचही विधानसभा मतदारसंघात बारणे यांनी दणदणीत आघाडी घेतली.

ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ राज्य केले होते. त्या महापालिकेच्या हद्दीतील चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघात पार्थ पवार यांना अतिशय कमी मते मिळाली. एकप्रकारे दीड वर्षापूर्वी ज्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाला जसे नाकारले होते. त्याप्रमाणे पवार यांच्या चिरंजीवाला तितक्या कठोरपणे पिंपरी चिंचवडकरांनी नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

चिंचवड मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना १ लाख ७६ हजार ४७५ मते मिळाली. पार्थ पवार यांना केवळ ७९ हजार ७१७ मते मिळविण्यात यश आले. पार्थ पवार यांना मिळालेल्या मतांपेक्षा बारणे यांची आघाडी ९६ हजार ७५८ इतकी मोठी होती.
पिंपरीमध्ये श्रीरंग बारणे यांना १ लाख ३ हजार २३५ मते मिळाली तर पार्थ पवार यांना केवळ ६१ हजार ९४१ मते मिळाली. मावळमध्ये बारणे यांना १ लाख ५ हजार २७२ मते मिळाली तर पार्थ पवार यांना ८३ हजार ४४५ मते मिळाली.
उरण मतदारसंघात पार्थ पवार यांना ८६ हजार ६९९ मते मिळाली तर, बारणे यांना ८९ हजार ५८७ मते मिळाली. कर्जत मतदारसंघात पार्थ पवार यांना ८५ हजार ८४६ मते मिळाली. तेथे बारणे यांना ८३ हजार ९९६ मते मिळाली. या मतदारसंघातच पार्थ हे १ हजार ८५० मतांची आघाडी मिळवू शकले.

मावळ मधील कर्जत, पनवेल आणि उरण हे तीन घाटाखालील मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यांच्यावर पवार यांची मदार होती. मात्र, गेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढविलेले लक्ष्मण जगताप यांना पनवेल आणि उरण मधून आघाडी मिळाली होती. तशी आघाडी पार्थ पवार यांना मिळू शकली नाही. घाटाखालील मतदारसंघात शेकाप प्रभावहीन होत असल्याचे हे या निकालाने स्पष्ट केले आहे. उलट भाजपा व शिवसेनेने एकजुटीने प्रचार केला होता.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यातून निवडणुकीपूर्वी विस्तवही जात नव्हता. युती झाल्यानंतरही लक्ष्मण जगताप यांनी अनेक आढेवेढे घेतले होते. शेवटी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कान ओढल्यावर ते प्रचारात सहभागी झाले. मनोमिलनाचा फायदा बारणे यांना येथे झाला. त्यामुळे बारणे यांना चिंचवड मधून सर्वाधिक मताधिक्य मिळू शकले.

मावळ मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा मतदारसंघात एकदाही यश मिळू शकले नव्हते. मागील वेळी तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे पार्थ पवार यांच्या रुपाने अजित पवार यांनी एक जुगार येथे खेळला होता. तो त्यांच्या अंगाशी आला, असेच म्हणावे लागेल.
………
जागा – श्रीरंग बारणे – पार्थ पवार
पनवेल – १६०३८५ – १०५७२७
कर्जत – ८३९९६ – ८५८४६
उरण  – ८९५८७ – ८६६९९
मावळ – १०५२७२ – ८३४४५
चिंचवड – १७६४७५ – ७९७१७
पिंपरी – १०३२३५ – ६१९४१
……..

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like