…आणि अशा प्रकारे आवळल्या लंडनमध्ये नीरव मोदीच्या मुसक्या 

लंडन : वृत्तसंस्था – कर्जबुडव्या नीरव मोदीला अखेर बुधवारी लंडन मध्ये अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नीरव मोदी हा मेट्रो बँकेच्या एका शाखेत खाते उघडण्यासाठी गेला होता त्याचवेळी बँकेतल्या एका सतर्क क्लार्कने त्याला ओळखले आणि लंडन पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच तेथे पोलीस पोहचले आणि त्यांनी निरव मोदीच्या मुसक्या आवळळ्या.

भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठा 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018 च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. दरम्यान काही पत्रकरांना निरव मोदी लंडनमध्ये दिसला होता त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

वेस्टमिन्स्टर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केल्यानंतर काल, बुधवारी लंडन पोलिसांनी नीरवला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं. त्याचा जामीन अर्ज फेटाळला असून, २९ मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.

नीरवला मेट्रो बँकेच्या एका शाखेतून अटक करण्यात आली, अशी माहिती न्यायालयात सुनावणीदरम्यान देण्यात आली. नीरव तेथील बँकेच्या शाखेत खाते उघडण्यासाठी गेला होता आणि तेथील क्लर्कनं त्याला ओळखलं. याबाबतची माहिती त्यानं पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि नीरवला बेड्या ठोकल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.