अहमदनगर जिल्ह्यातील निघोज प्रकरण : ‘ऑनर किलिंग’ नाहीच ! पोलिसांच्या तपासातून निघाला निष्कर्ष

अटकेतील तिघांना गुन्ह्यातून वगळणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील निघोज येथील रुख्मिणी रणसिंग हिची हत्या ‘ऑनर किलिंग’ नसून, तिचा खून केला आहे, या निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले तिचे वडील, काका व मामा यांना गुन्ह्यातून वगळले जाणार आहे, असे सूत्रांकडून समजते.

मयत रुक्मिणी हिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार पारनेर पोलिसांनी आंतरजातीय विवाहातून तिला पेटवून दिल्याप्रकरणी वडिलांसह तिघांना अटक केली होती. परंतु, रुख्मिणीने सासरच्यांच्या दबावातून मृत्युपूर्व जबाब दिला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी हा प्रकार ‘ऑनर किलिंग’ असल्याचे वाटले. मात्र पोलिसांनी दिलेल्या तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रुख्मिणी हिचा खून ‘ऑनर किलिंग’ नसून पती मंगेश रणसिंग यानेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे.

याबाबत पोलिसांनी मयत रुख्मिणीचा सहा वर्षांचा भाऊ नंचू, मंगेश याला पेट्रोलची बाटली घेऊन जाताना पाहणारे साक्षीदार व घराचा दरवाजा उघडणारे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पारनेर येथील न्यायालयासमोर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 164 प्रमाणे नोंदविले आहेत. त्यानुसार रुख्मिणीचा खून तिच्या पतीनेच केल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अटक केलेल्या तिघांनाही वगळून तिच्या पतीला अटक केले जाणार आहे, असे सूत्रांकडून समजते. संशयाची सुई असलेला मंगेश याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्याच्या अटकेची कारवाई केली जाईल, असे समजते.

Loading...
You might also like