नीरेत महावितरणने ‘शॉक’ दिल्याने BSNL च्या ग्राहकांची ‘गैरसोय’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बीएसएनएलने गेल्या तीन महिन्यांपासून महावितरणचे वीज बिल न भरल्याने थकबाकी झाल्याने मंगळवारी (दि.१९) पासून महावितरणने विद्युत पुरवठा बंद करून बीएसएनएलला शॉक दिला आहे. दरम्यान, नीरा येथील बीएसएनएलचे मोबाईल, लँडलाईन ग्राहकांची सेवा ठप्प झाली असून ग्राहक हैराण झाले आहेत.

नीरा (ता.पुरंदर) येथील बीएसएनएलचे मोबाईल, इंटरनेट, लँडलाईनचे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र वारंवार बीएसएनएलकडून वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा बंद केला जात असल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. वास्तविक बीएसएनएलची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना ती सुधारण्यासाठी बीएसएनएलने ग्राहकांना तत्पर व अखंडीत सेवा देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या योजनांकडे वळविणे गरजेचे असताना उलट वीज बिल न भरता ग्राहकांची गैरसोय करून ग्राहकांचा रोष ओढवून घेत आहेत. बीएसएनएलच्या कारभाराविषयी ग्राहक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

नीरा येथील बीएसएनएलचे सहाय्यक अभियंता सुरेश भगत म्हणाले कि, वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने मंगळवारी (दि.१९) बीएसएनएलचा विद्धुत पुरवठा खंडित केल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून डिझेलवर जनरेटर चालू केला आहे. त्यामुळे पणजी, कोल्हापूर, पुणे हे बीएसएनएलचे महत्वाचे स्टेशन असलेले १० ओएफसीची मेन सिस्टीम चालू ठेवली असून, बँकांचे लीज लँडलाईन, ब्राँडबँड चालु ठेवले असल्याने बँकांचे व्यवहार व मोठ्या शहरांशी संपर्क चालू ठेवला आहे. मात्र नीरा व परिसरातील मोबाईल व लँडलाईन सुविधा बंद झाल्या आहेत.

दरम्यान, बीएसएनएलने नीरा वगळता इतर ठिकाणच्या कार्यालयातील ही सुमारे तीन महिन्यापासून वीजबिल भरले नाही. परंतु संबंधित ठिकाणच्या महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित केला जात नाही. मात्र नीरा येथील महावितरण कार्यालयाकडूनच बीएसएनएलचा कोणतीही सूचना न देता वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बीएसएनएलकडे महावितरणचे सुमारे तीन महिन्यांचे वीज बिल थकबाकी असल्याने ते न भरल्याने मंगळवारी ( दि.१९) दुपारी बीएसएनएल चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
(मनोज पाटील, शाखा अभियंता, महावितरण, नीरा)

सध्या बीएसएनएल आर्थिक संकटात साापडले असल्याने वीज बिल भरण्यास विलंब होत आहे. राज्यातील सर्व केंद्राच्या वीज बिलांची रक्कम दिल्ली येथील कार्यालयाकडून दिली जात असून त्यासाठी सतत दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे.
(अनिल भालेराव, डेप्युटी जनरल मँनेजर,बीएसएनएल, पुणे ग्रामीण विभाग, पुणे)

बीएसएनएलने व महावितरण ह्या दोन्ही शासकीय खाती आहेत . त्यामुळे दोन्हीही खात्यांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये या करिता प्रयत्न करावेत. ग्राहकांना अखंडित सेवा द्यावी.
(अशोक रणदिवे, बीएसएनएलचे ग्राहक व भाजपचे कार्यकर्ते)

Visit :  Policenama.com 

You might also like