सभोवतालचे वातावरणही ठरू शकते लठ्ठपणाचे कारण

पोलीसनामा ऑनलाईन – लठ्ठपणासाठी साधारणपणे अतिखादाडपणा कारणीभूत समजला जातो. मात्र फक्त खाणेपिणेच नाही तर सभोवतालच्या वातावरणामुळेही तुम्ही लठ्ठपणाची शिकार ठरू शकता. एका ताज्या अध्ययनातून हे समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

तुमच्या अवतीभोवती लठ्ठपणाची समस्या असलेले जास्त लोक राहत असतील तर तुम्हीही लठ्ठपणाची शिकार ठरू शकता. या अध्ययनात सहभागी प्राध्यापक आश्लेषा दातार यांनी सांगितले की, लठ्ठपणाचा संबंध खाणेपिणे आणि व्यायामाशी संबंधित सवयी आणि काही अनुवांशिक कारणांसोबत असतो. समजा तुम्ही लठ्ठपणाची शिकार ठरलेल्या लोकांमध्ये राहत असाल, तर तुम्हीही आळशी बनू शकता. सवयींवर पडणारा हाच प्रभाव तुम्हाला लठ्ठ बनवू शकतो. या अध्ययनातून असेही आढळून आले की, याच प्रभावामुळे काही समुदायाचे लोक अन्य लोकांच्या तुलनेत जास्त लठ्ठपणाने ग्रस्त असतात. अशाच प्रकारे काही देश आणि शहरांमध्ये लठ्ठपणाची समस्या जास्त असते.