भाजपकडून राज्यात ऑपरेशन ‘लोटस’ सुरू, ‘या’ 4 बड्या नेत्यांवर जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काल (शनिवार) सकाळी आठ वाजण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्यासाठी फडणवीस यांना 7 दिवसाची म्हणजेच 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. दुसरीकडे लागलीच महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेविरूध्द तसेच राज्यपालांच्या निर्णयाविरूध्द सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून त्यावर रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होईल असं सांगितलं.

आज (रविवार) सकाळी सुनावणी झाली आणि न्यायालयानं सॉलिसिटर जनरल यांना काही कागदपत्र उद्या (सोमवार) सकाळी 10.30 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला आणखी काही आमदारांची गरज आहे. भाजपने राज्यात ऑपरेशन लोटस सुरू केल्याची सुत्रांनी माहिती दिली असून बहुमताचा आकडा मिळविण्यासाठी आमदारांची जमावाजमव करण्याची जबाबदारी चार बडया नेत्यांवर सोपवली असल्याची सुत्रांची माहिती आहे.

बबनराव पाचपुते, गणेश नाईक, नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भाजपने जाबबदारी सोपविली असल्याचं सांगण्यात आलं आहे. नारायण राणे हे शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील अनेक आमदारांना ओळखतात एवढेच नव्हे तर ते पुर्वी त्या पक्षात होते. राधाकृष्ण विखे-पाटील हे काँगे्रस पक्षात असताना विरोधी पक्ष नेते होते. बबनराव पाचपुते, गणेश नाईक हे दोघे पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे विखे, राणे, नाईक आणि पाचपुते यांच्यावर भाजपनं मोठी जाबाबदारी सोपवली आहे.