माऊलींच्या नीरा स्नानाची परंपरा कायम ठेवावी ! नीरा- पाडेगांंव येथील दत्तसेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह भाविकांची मागणी

नीरा: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. मात्र, आळंदी आणि देहूच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरला देवभेटीस चार चाकी वाहनाने, हेलीकॉप्टरने किंवा विमानाने जाणार इथपर्यंत जवळ पास निर्णय येऊन ठेपला आहे. मात्र परंपरेनुसार माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला फार महत्व आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रशासनाने फक्त पालखी सोहळा मालकांच्याच हस्ते यंदा माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालून माऊलींच्या नीरा स्नानाची शेकडो वर्षाची असलेली परंपरा कायम ठेवावी अशी मागणी नीरा – पाडेगांव (ता.खंडाळा) येथील श्री.क्षेत्र दत्तसेवा मंडळाच्या पदाधिका-यांसह भाविकांनी केली आहे.

माऊलींच्या पालखी सोहळयादरम्यान परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांना आळंदीतील इंद्रायणी नदीच्या तीर्थाने स्नान घातले जाते. पालखी सोहळा आळंदीतुन प्रस्थान झाल्यानंतर सोहळा पुणे जिल्ह्यातील पुणे , सासवड, जेजुरी, वाल्हा, येथील मुक्काम करीत पुणे – सातारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पुरंदर तालुक्यातील नीरा या गावी दुपारच्या नैवेद्यासाठी विसावत असतो. त्यानंतर पालखी सोहळा पाडेगांव (ता.खंडाळा) येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याचा निम्म्या टप्पा पुर्ण होत असतो. हा निम्मा टप्पा पुर्ण होत असताना माऊलींच्या पादुकांना रथातून उतरवून नीरा नदीवरील प्रसिद्ध दत्तघाटावर सोहळ्या दरम्यान नीरा स्नान घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. माऊलींना स्नान घातले जाते त्यावेळी सोहळ्यातील लाखो वारकरी , भाविक नीरा नदीवरील दत्तघाटावर व परिसरात उभे राहून भक्तिभावाने माऊलींचा जयघोष करीत माऊलींचे नीरा स्नान आपल्या डोळ्यात टिपत असतात. त्यामुळे लाखो वारक-यांंच्या दृष्टीने माऊलींच्या पादुकांना नीरा स्नानाला महत्व आहे.

त्यामुळे यंदा जर माऊलींच्या पादुका देवभेटीस एस.टी. बसने किंवा चार चाकी वाहणाने पंढरपूर कडे जाणार असतील पाडेगांव (ता.खंडाळा ) येथील नीरा नदीवरील दत्तघाटावर पोलिस बंदोबस्तात एकट्या पालखी सोहळा मालकांच्याच हस्ते माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालून माऊलींच्या नीरा स्नानाची शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवावी अशी मागणी नीरा-पाडेगांव (ता.खंडाळा) येथील श्री.क्षेत्र दत्तसेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन कुुलकर्णी, विश्वस्त प्रदीप काकडे, राजेेश चव्हाण, जनार्दन दानवले या पदाधिका-यांसह नीरा , पाडेगांव येथील भाविकांंनी केेली आहे.

” यंदा कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द केला असला तरी माऊलींच्या नीरा स्नानाची परंपरा खंडीत होणार नाही. अशी आम्हाला आशा आहे. परंतु आषाढ शुद्ध दशमीला माऊलींच्या पादुका चार चाकी वाहणांतून पंढरपूरला नेण्याचा निर्णय झाला तरी प्रशासनाने व सोहळा मालकांनी माऊलींच्या पादुकांंना परंपरेनुसार
नीरा स्नान घालून नीरा स्नानाची परंपरा कायम ठेवावी अशी आमच्या ट्रस्टची मागणी असल्याचे नीरा- पाडेगांंव येेेथील श्री. क्षेत्र दत्तसेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांंनी सांगितले.”

माऊलींच्या पादुकांना पंढरपुर कडे मार्गस्थ करण्यासाठी प्रशासनाने चारचाकी वाहणांतून जाण्याचा निर्णय घेतला तर नीरा – पाडेगांवच्या दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना पोलिस बंदोबस्तात फक्त पालखी सोहळा मालकांच्याच हस्ते नीरा स्नान घालून माऊलींच्या नीरा स्नानाची परंपरा कायम ठेवावी असे मत श्री. क्षेत्र दत्तसेवा मंडळाचे विश्वास राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले.