पंकजा मुंडेंचं उपोषण मागे, म्हणाल्या – ‘यापुढे मी ‘समाजसेविका’ म्हणून काम करणार’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडे यांनी आज मराठवाड्याच्या प्रश्नी केलेले उपोषण मागे घेतले. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयासमोर हे उपोषण करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सरकारकडे मराठवाड्याच्या विकासाची मागणी केली. यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे, महादेव जानकर देखील उपोषणाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेसाठी मी काम करणार आहे. यापुढे मी समाजसेविका म्हणून काम करणार आहे. मी पक्ष सोडणार या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका.

यावेळी सरकारवर टीका करणार नाही असे म्हणतात पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी सरकारवर टीका करणार नाही, सरकारला येऊन अजून 100 दिवसही झाले नाहीत. ठाकरे सरकारने आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवावे. शेतकऱ्यांना पाणी आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. तृप्ती देसाई यांनी देखील उपोषणाला पाठिंबा दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडून आणि सरकारकडून आपल्याला अपेक्षा असल्याचे सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आले. आज सरकारच्या विरोधात उपोषण करण्याचा दिवस नाही. मराठवाड्याला पाणी मिळालं तर कधीही कर्जमाफीची आवश्यकता भासरणार नाही. हे सरकार काम पूर्ण करेल यावर माझा विश्वास आहे. मराठवाड्याला न्याय मिळावा असेच मला वाटते.

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं, याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हक्काचं 17 टीएमसीचं पाणी मराठवाड्याला मिळालं पाहिजे. मराठवाड्याला पाणी देण्याची इच्छाशक्ती मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. ठाकरे सरकारने मराठवाड्यात एक कॅबिनेट बैठक घ्यावी असे ही त्यांनी उपोषणावेळी सांगितले. यानंतर पंकजा मुंडे यांंनी एका लहान मुलीच्या हाताने पाणी पिऊन आपले एक दिवसीय लक्षणीय उपोषण मागे घेतले.