पार्थ पवार यांचे ‘ते’ फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्ह्याधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. तर पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील इसम, निखील देवकाते-पाटील, श्रीमंत व इतर व्हाट्सअप्प ग्रुप वर फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एका तरुण मुलीची बदनामी करत पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील काही फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. राजकारणात संबंधित तरुणीचा नाहक बळी दिला व तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. विरोधी पक्षाने युवा उमेदवार पार्थ पवार यांची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खाजगी फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेज तसेच व्हाट्सअप्प ग्रुप यासारख्या सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे फोटो व्हायरल होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे चारित्र्य मलिन होत आहे, त्यामुळे अशा पोस्ट, फोटो व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस फोटो, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची माहिती गोळा करत आहेत.