संधी द्या…साहेब, दादांप्रमाणे काम करेन : पार्थ पवार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – नमस्कार…मी पार्थ अजित पवार,  आज माझे पहिले भाषण आहे… मी राजकारणात नवीन आहे, आज पर्यंत आपण पवार कुटुंबावर प्रेम केले असून तेच माझ्यावर करावे. मला एकदा संधी द्या, मी शरद पवार साहेब आणि अजितदादांसारखे काम करून दाखवेन असे मत मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केले.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ आज चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे फोडला. यावेळी जाहीर मेळावा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते.

मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. या भाजप, शिवसेना सरकारने अत्यंत चुकीची कामे केलीत. पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास शरद पवार साहेब, अजितदादांनी केलाय. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.