भाजपा तालुकाध्यक्षांनी नागरिकांची घरं पाडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे ग्रामपंचायत रस्त्याच्या कामासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी तसेच सरपंच मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांनी दहशत निर्माण करून जेसीबी मशीन पोकलेन मशीनच्या साह्याने घर पाडले, अशी तक्रार स्थानिक रहिवाशी सुरेश महादेव खेडकर यांनी केली आहे. त्यांचे राहते घराची कुठलीही पूर्वसूचना न देता पाडापाड करून घरातील सामानाची नुकसान केलेबाबत गटविकास अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुरेश खेडकर यांचे भालगाव येथे वडिलोपार्जित मिळकत क्रमांक २०५ मध्ये जुने राहते घर असून 23 मार्च रोजी दुपारी ४ वाजता ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी तसेच दिलीप खेडकर यांनी दहशत निर्माण करून स्थानिक रहिवाशी यांना कुठलीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता जेसीबी पोकलेनच्या साह्याने रस्त्याचे रुंदीकरण सुरू केले. रुंदीकरण सुरू असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांच्या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या. याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. परंतु काहीच कार्यवाही न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेतला. याबाबत सुरेश खेडकर यांनी त्यांच्या घराची पाडापाड करणारावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली असून तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जात संतोष भंडारी, पंकज भंडारी, विष्णू अडसूळ, अर्जुन सुपेकर तसेच दहा ते इतर दहा ते पंधरा लोकांचे बांधकाम पाडले असल्याने झालेल्या नुकसानाची पंचनामा करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.