पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरीत पिक कर्ज वाटप करावे

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – खरीप हंगामातील पिक कर्जास होत असलेली टाळाटाळ व पिक कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यास विलंब होत असलेल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतातील पिकांची फवारणी, खुरपन, तोंडावर आले असताना खिश्यात एक रुपयाही नसल्याने, तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामातील कर्ज शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार दि 05 जुलै रोजी पाथरी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली.

या दरम्यान शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक यावर चर्चा करण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी जयजयराम विघ्ने यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांनी बॅंक शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली.

यावेळी खरीप पिक कर्ज, पुनर्गठन, नवीन पिक कर्ज आशा अनेक विषयांवर चर्चा करून बॅंकेच्या संबंधीत विभागीय अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करण्यात आला. याप्रसंगी बॅंकेच्या विभागीय अधिकारी यांनी काही दिवसात निपटारा होईल असे सांगितले.

दत्तक असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या होत असलेल्या कामांना विलंब व त्यासाठी मारावे लागत असलेले हेलपाटे यात शेतकरी हवालदिल झाला आहे. यासाठी शाखा व्यवस्थापकांनी खरीपाचे पिक कर्ज वाटप प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी जयजयराम विघ्ने यांनी सांगितले. तसेच खरीप हंगामातील पिक कर्ज वाटपास प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक कर्ज प्रकरणे व्यवस्थित रित्या हाताळण्यात येतील असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. यावेळी बँकेच्या परिसरातील उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेऊन अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रहारचे पदाधिकारी जयजयराम विघ्ने यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –