चोरी करण्यासाठी कार चोरणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चोरी करुन पलायन करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची कार जप्त करण्यात आली आहे. दत्तात्रय आण्णा डुबे (३१, रा. मोरेवस्ती, चिखली, मूळ रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि दत्तात्रय पांडुरंग रंदवे (२८, सध्या रा. कांदेवस्ती इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मोटर्स काळभोरनगर येथून फॉक्सवॅगन कंपनीची जेट्टा कार (एमएच १४, एफएस ४६७९)च्या ‘टेस्ट ड्राइव्ह’साठी जाताना डुबे आणि रंदवे यांनी कारच्या इंजिनचा आवाज येत असल्याचा बहाणा करून शोरूमच्या कर्मचा-याला खाली उतरवले. कर्मचारी खाली उतरला असता दोघांनी कार घेऊन धूम ठोकली.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कारचा शोध घेत असताना पोलीस नाईक सतीश ढोले यांना माहिती मिळाली की, चोरीला गेलेली कार घेऊन दोघेजण म्हाळसकरवाडी येथील पैसा फंड काच कारखान्यासमोर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे पैशांची अडचण भासू लागली. पैशांची गरज पूर्ण कारण्यासाठी भिगवण, बारामती परिसरात सोने चोरी करायचे. चोरी केल्यानंतर कारमधून पळून जायचे. यासाठी कार चोरली. कार चोरल्यानंतर कार सुरुवातीला निगडी येथील घरकुल परिसरात पार्क केली आणि चोरटे निघून गेले. दोन दिवसांनी बनावट नंबर प्लेट बनवून कार भिगवण, सोलापूर येथे गेले. त्यानंतर कार मोरेवस्ती चिखली येथे पार्क करून ठेवली, असल्याचेही चोरट्यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, स्वामिनाथन जाधव, रमेश मावसकर, सतीश ढोले, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, प्रवीण मुळूक, सोमनाथ दिवटे, विलास केकाण यांच्या पथकाने केली.