रिमोट ‘कंट्रोल’वर महापौरांकडून सभागृहाचे कामकाज; विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा म्हणजे ‘हुकूमशाही’ पद्धतीचा एक नमुनाच म्हणावा लागेल. या सभेत महापौर माई ढोरे यांनी कुणाचे तरी ऐकून ‘रिमोट कंट्रोल’ प्रमाणे सभागृहाचे कामकाज केले. अनेक नगरसेवकांना आजच्या सभेत मते मांडायची होती. मात्र महत्त्वाचा विषय असताना देखील तो तहकूब करत सभा गुंडाळण्याची ‘नामुष्की’ सत्ताधारी भाजपवर आली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमीन मालकास मोबदला करण्याचा विषय महापौरांनी कोणतीही चर्चा न करतात तहकूब करत दप्तरी दाखल केला. त्यावरून आजच्या महापालिकेच्या सभेत चांगलाच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पत्रकार परिषद घेत महापौर माई ढोरे आणि सत्ताधारी भाजपाच्या कार्यपध्दतीवर हल्लाबोल केला.

नाना काटे म्हणाले की, आजच्या सभेत खाजगी वाटाघाटी, भूसंपादनाच्या विषयावर सर्वच पक्षातील नगरसेवकांना आपली मते मांडायची होती. मात्र स्थानिक नगरसेवकांना देखील या विषयावर महापौरांनी बोलू दिले नाही. हुकूमशाही पद्धतीने हा विषय तहकूब करून दप्तरी दाखल केला गेला. त्यांची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना अशा पद्धतीनं सभागृह कधीच चालू दिले नाही.

महापौर माई ढोरे या कुणाच्यातरी ‘रिमोट कंट्रोल’वर विषय मंजूर-नामंजूर करत असल्यासारखे सभागृह चालवत होत्या. वास्तविक पाहता शेतकऱ्यांशी निगडीत असलेला हा विषय दप्तरी दाखल केला गेला. येणाऱ्या काळात नक्कीच सत्ताधारी भाजपला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/