हैदराबाद घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील निर्जनस्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद येथील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील निर्जनस्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व निरीक्षकांना दिले आहे. याठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. याच बरोबर प्रतिसाद अ‍ॅप व पोलिस ठाणे स्तरांवर बडी-कॉप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यात येणार आहेत. शहरातील ‘ओपन बार’ बंद करण्यात येणार आहेत.

रिक्षा व व्यावसायिक वाहनांवर पोलिसांचा १०० क्रमांक लिहिला जाणार आहे, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात व्यावसायिक वाहनांवर स्टिकर्स कर्स लावन्यात येणार आहेत, हिंजवडी व चाकण परिसरातील कामगार महिला-मुलींसाठी कंपन्यांशी चर्चा केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रामुख्याने हिंजवडी आयटीपार्क, चाकण औद्योगिक पट्टा, महाविद्यालये, हॉस्टेल्स, गृहसंकुल आदी ठिकाणी टवाळखोरांकडून कोणाला त्रास होत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने याठिकाणी गस्त वाढविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. निर्जनस्थळे, कायम अंधार असणारी ठिकाणं, लष्कराच्या मालकीच्या मोकळ्या जागा, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीला लागून असलेला परिसर, महामार्ग आदी ठिकाणी पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये विनयभंग व बलात्काराचे गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे व महिलांना त्रास देणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या लोकांची पुन्हा धरपकड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील महिलांसाठी काम करणाऱ्या व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शहरातील काही भागांची माहिती आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याठिकाणी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणांवर महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिस ठाण्यातील तपास पथकांचे कर्मचारी व काही महिला कर्मचारी हे साध्या वेशात गस्त घालण्यात येणार आहे. महिलांनी देखील होणाऱ्या त्रासाबाबात तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. पोलिस काका, बडी-कॉपच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर पोलिसांनी बैठका येत्या काळात घेण्यात येणार असून, याव्दारे कोणती तक्रार पुढे येते का हे पाहणे यामागील उद्दिष्ट्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

“निर्जनस्थळ कोणती आहेत. महिलांची ये-जा असणारा परिसर, ज्याठिकाणी रस्त्यावर लाईट नाहीत, ओसाड जागा आदींचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती एकत्रित झाली असून, या ठिकाणांवर आमचे विशेष लक्ष असणार आहे. गस्त वाढविण्याबरोबरीनेच निर्जनस्थळ आता ‘पोलिस डॉमिनेटिंग एरिया’ म्हणून ओळखली जातील जेणे करून शहरात कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेत आहोत.”
– संदीप बिष्णोई, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड

Visit : policenama.com