पिंपरीत बनसोडेंच्या घड्याळाची ‘टिकटिक’ की चाबुकस्वारांचा ‘धणुष्यबाण’ नेम धरणार, राष्ट्रवादीचं पारडं जड ?

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक चुरस असलेल्या पिंपरी राखीव मतदारसंघातून आपणच विजयी होणार असल्याचा दावा युतीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबूकस्वार आणि आघाडीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. आजी-माजी आमदारांमध्ये होत असलेल्या या लढतीकडे संपूर्ण औद्योगिक नगरीचे लक्ष लागून राहिले आहे. आजी आमदार पुन्हा आमदार होणार की माजी आमदार पुन्हा बाजी मारणार हे गुरुवारी (दि.24) स्पष्ट होईल.

2014 च्या लढतीमध्ये विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार हे अवघ्या 2 हजार 345 मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी 25 हजार मतांनी विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. तर 2014 निवडणुकीत निसटता पराभव झालेले अण्णा बनसोडे यांनी आपण पुन्हा आमदार होणार असल्याचा दावा केला आहे. मागील निवडणुकीतील तेच दोन उमेदवार पुन्हा एकदा आमने-सामने आल्याने यांच्यात ‘टफ फाईट’ पहायला मिळाली.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी झालल्या गोंधळामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले हे निकालानंतरच समजेल. 2014 मध्ये शिवसेनेचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादीचे बनसोडे, रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे आणि काँग्रेसचे मनोज कांबळे यांचा पराभव केला. यंदा दुसऱ्यांदा चाबुकस्वार विरुद्ध बनसोडे यांच्यातील सामना रंगत आहे. गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत उत्सुकता आहे.

Visit : Policenama.com