फसवणूक करणाऱ्याचे बिंग फुटल्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून ओटीपी मागणाऱ्या फोनवरील ठगाची महिलेने उलट तपासणी घेतली. आपले फसवणुकीचे बिंग फुटल्याचे लक्षात येताच त्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. याबाबत बुधवारी (१८ मार्च) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबईलधारक राकेश शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पीडित महिलेच्या मोबाईल फोनवर आरोपीने फोन केला. ‘मी बजाज फायनान्स कंपनीकडून बोलत आहे. तुम्ही घेतलेल्या वस्तूवर चार हजार रुपयांचा रिफंड मिळणार आहे,’ असे आरोपीने सांगितले आणि फिर्यादी यांच्या फोनवर एक मेसेज पाठवला. ‘तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला आहे. तो मला सांगा’ असे आरोपी म्हणाला.

त्यामुळे फिर्यादी यांना त्याचा संशय आला. फिर्यादी यांनी समोरील व्यक्तीचे नाव, एम्प्लॉय आयडी विचारला. आपले फसवणुकीचे बिंग फुटल्याचे लक्षात आल्याने आरोपीने फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.