पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘असा’ही १ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाभरात भाजपचा एक हाती प्रचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसभरात ३ ते ४ प्रचार सभा घेत आहेत. त्यामध्ये ते काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांपासून राहुल गांधींवर निशाणा साधत आहेत. त्यांच्या या सभेतील वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम किमान पुढील ५ वर्षे तरी कोणीही मोडू शकणार नाही.

निवडणुक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यावर क्लिन चिट मिळणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

राजीव गांधी भ्रष्टाचारी नबंर वन अशी टिका नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याविरुद्ध निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. निवडणुक आयोगाला या वक्तव्यात कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने मोदी यांना क्लिनचिट दिली आहे. निवडणुक आयोगाकडून एका पाठोपाठ ९ प्रकरणात क्लिनचिट मिळणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. हा विक्रम पुढील ५ वर्षात तरी कोणाला मोडता येणार नाही.

निवडणुक आयोगाने सैनिकांचा प्रचारात वापर करु नये, असा आदेश दिला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमधील औसा येथील प्रचार सभेत प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणाईला आवाहन करताना त्यांचे पहिले मत पुलवामा हल्ल्यातील सैनिकांना समर्पित करावे, असे आवाहन केले होते. तसेच अहमदाबाद येथे मतदान करण्यासाठी जाताना त्यांनी रोड शो केला होता. या दोनही तक्रारीविरोधात मोदी यांना निवडणुक आयोगाने क्लिनचिट दिली आहे.

निवडणुक आयोगाने नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत ९ प्रकरणात क्लिनचिट दिली आहे. याशिवाय मोदीविरोधात आणखी काही तक्रारी निवडणुक आयोगाकडे आल्या आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध या निवडणुकीत ३ तक्रारी करण्यात आल्या. त्यातील दोन प्रकरणात त्यांच्यावर प्रचारबंदी लादण्यात आली होती. आझमखान यांनाही दोन वेळा प्रचारबंदी करण्यात आली आहे.

मात्र, इतक्या तक्रारी होणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रीय नेते आहेत. राज्य पातळीवरील कोणत्याही नेत्याविषयी इतक्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्यामुळे मोदी यांचा हा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहणार आहे.