महापालिकेच्यावतीने दहावीच्या परिक्षार्थींसाठी २४ फेब्रुवारीला व्याख्यानमालेचे आयोजन

विषयांच्या तयारीसाठी तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या वतीने प्रथमच दहावीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी परिक्षा पद्धती, ताणतणाव कमी करण्यासाठीचे उपाय आणि इतर विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे, हा उपक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती सभागृह नेते धीरज घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुढील महिन्यांत दहावीच्या परिक्षा सुरू होत आहेत. या पार्श्‍वभुमीवर हा उपक्रम विद्यार्थ्यांना निश्‍चित उपयुक्त ठरेल. अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटे यांनी केले. ते म्हणाले, सकाळी ९ वाजता महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एस.एस.सी. बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांच्या उपस्थितीत या व्याख्यानमालेचा आरंभ होईल. यावेळी विद्यार्थ्यांची नाव नोंदणीही करण्यात येणार आहे.

सकाळी १० ते ११ या वेळेत डॉ. स्नेहा जोशी या मराठी, ११ ते १२ या वेळेत डॉ. उमेश प्रधान हे इंग्रजी, तर १२ ते १ या वेळेत डॉ. जयश्री अत्रे गणित या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर २ ते ३ या वेळेत डॉ. अ.ल.देशमुख हे विज्ञान, शिवानी लिमये या समाजशास्त्र आणि अनिल गुंजाळ हे परिक्षेला जाता जाता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी एक ते दोन या वेळेत विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज शहरातील महापालिकेच्या शाळांसह, काही खाजगी शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना व्याख्यानमालेची संकल्पना विषद करण्यात आली. या सर्व मुख्यध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

You might also like