अन् PMPML च्या बैठकीमध्ये ‘प्रशासन’ व ‘सल्लागारा’ची ‘कोंडी’, स्थायी समिती अध्यक्षांच्या मागणीने सल्लागाराने प्रेझेंटेशन गुंडाळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अगदी छोट्या मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागारांचा आश्रय घेउन महापालिकेने कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या सल्लागारांवर होणार्‍या उधळपट्टीवरून स्वंयसेवी संस्थांनीही प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरल्याचे आपण पाहीले आहे. परंतू आज प्रथमच नगरसेवकांनी सल्लागाराचीच अशी काही कोंडी केली की सल्लागार आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनीही चुप्पी साधली.

निमित्त होते पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीचे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच संचालक बदलानंतरची ही तशी पहिलीच बैठक होती. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये एका सल्लागार कंपनीने पीएमपीएमएलचा तोटा कमी करण्यासाठी केलेल्या प्लॅनिंगचे सादरीकरण केले.

सादरीकरणावेळी टोटल इंग्लिशमध्ये सादरीकरण करणार्‍या सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधीच्या दुसर्‍या तिसर्‍याच वाक्याला ब्रेक लावत, मराठीतून बोलण्यास सांगितले. या सल्लागाराने पुढे पीएमपीएमएलच्या दोन रुटचा मागील तीन महिने अभ्यास करून दोन्हीही रुटवर दरमहा २० लाखांनी उत्पन्न वाढीबाबत केलेल्या उपाययोजनांची मांडणी करत संचालकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला.

परंतू त्याची ही मार्केटींगची मात्रा, फारकाळ चालली नाही. त्याला कारण ठरले ते स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने. हेमंत रासने यांनी त्याचे बोलणे मध्येच थांबवत, पीएमपीएमएलचे ३७५ रुटस् असून प्रत्येक रुटवर २० लाख याप्रमाणे उत्पन्न वाढवून द्या. तेवढे न झाल्यास किमान दरमहा ५० कोटी रुपयांनी वाढवून देतो असे लेखी देत असाल तर तुमचीच सल्लागारपदी नेमणूक करून टाकतो, असा गिअर टाकला. यामुळे सल्लागार कंपनीचा प्रतिनिधी गोंधळून गेला. सादरीकरण आणि प्रत्यक्ष उत्पन्न वाढ करून देण्याचे आश्‍वासन यामुळे त्याची अवस्था केविलवाणी झाली आणि विषय तेथेच थांबला.

प्रशासनातील अधिकार्‍यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही याप्रकरणी निविदा काढण्यात येईल, असे सांगितले. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने यांनी निविदा काढण्यापुर्वी त्यातील अटी शर्तींंसह निविदा संचालक मंडळासमोर ठेवा, त्याशिवाय कुठलीही कार्यवाही करू नका, अशी सूचना केली. यानंतर विषय पुढे सरकला, अशी माहिती एका पदाधिकार्‍याने दिली. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/