पोलिसांनी खिलाडू वृत्तीने कर्तव्य निभवावे : पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पोलीस कर्मचाऱ्यांना रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ताणतणावापासून दूर राहून सशक्तपणे आणि खिलाडू वृत्तीने आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप शुक्रवारी (दि.२३) येथील सायंकाळी पोलीस मुख्यालय मैदानावर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सीईओ अजित कुंभार हे होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक स्वप्नील राठोड, भास्कर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ताणतणावमुक्त जीवनशैलीसाठी खेळांची आवड जोपासली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विशिष्ट ठिकाणीच नियुक्ती मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी पेलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी कामाप्रती एक निष्ठ राहून नैतिकतेने काम करावे. प्रत्येक पोलीस कर्मचारी हा समाजाचा लीडर आहे पोलीस कर्मचारी यास जेथे काम दिले जाईल तेथे खिलाडी वृतीने आव्हान स्वीकारून काम करावे. आज खाजगी / कार्पोरेट क्षेत्रात तील व्यक्ती पेक्षा युनिफॉर्म सर्विस मध्ये शासनाने अनेक सुविधा पुरविल्या असून प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही शाशनाप्रती म्हणजेच जनतेप्रती एकनिष्ठ राहून नेमून दिलेले कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.

पोलीस मुख्यालय मैदानावर गुरुवारी (दि.२२) उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी तसेच १००, २००, ४०० व ८०० मिटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, कुस्ती, पोहणे, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो आदी स्पर्धा पार पडल्या. शुक्रवारी (दि.२३) उर्वरित स्पर्धा घेऊन त्यानंतर समारोप कार्यक्रम घेण्यात आला. निमंत्रित पोलीस अधिकारी-नागरिकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. यात पोलीस संघाने विजय मिळवला. संगीत खुर्चीमध्ये रंभा नेटके व तेजस्विनी कांबळे यांनी अनक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला. लिंबू चमचामध्ये करण लोखंडे व शेख अमीन शेख जमाल तर ५० मिटर धावण्याच्या स्पर्धेत शेख युसूफ शेख युनूस, मन्यार अब्दुल लतीफ या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय बक्षीस मिळवले. महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० मिटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. महिलांमधून पूजा चाटे प्रथम व पूनम झेंड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. संदीप कांबळे व आर.व्ही. सुरवसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक संपादन केला.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, क्रीडा प्रमुख शेख बाबर, मनोज जोगदंड, कलीम इनामदार, प्रमोद वारे, अनिल शेळके, बाबा निसर्गंध, जयदीप सोनवणे, विष्णू काकडे, तावरे, चव्हाण यांनी परिश्रम घेतले. यावेळी खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
या क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन दिवस शहरातील विविध शासकीय, खासगी शाळांमधील, आश्रमशाळा, निवासी शाळा तसेच मदरशामधील विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित केले होते. त्यांना ने-आण करण्यासाठी पोलीस वाहनांची सोय केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या क्रीडा स्पर्धांचा आनंद घेता आला. शुक्रवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय अभ्यासासोबतच खेळ आवश्यक असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहितीही दिली.

पोलीस मुख्यालयास विजेतेपद
या क्रीडा स्पर्धेत अंबाजोगाई, बीड, आष्टी व पोलीस मुख्यालय अशा एकूण चार विभागांचे संघ सहभागी होते. पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उत्कृष्ठ महिला खेळाडू म्हणून मपोकॉ नेहा करवंदे तर उत्कृष्ठ पुरुष खेळाडू म्हणून युवराज पवार यांची निवड झाली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक सलोख्यासाठी एकता चषक
शुक्रवार सकाळी ८ ते ११ या वेळेत सामाजिक सलोख्यासाठी विविध जाती-धर्मांच्या खेळाडूंच्या बीड व अंबाजोगाई संघात फूटबॉलचा सामना खेळविण्यात आला. अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली. यामध्ये अंबाजोगाई संघाने बाजी मारुन एकता चषक पटकावले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like