उड्डाणपुलाखालील पोलीस चौक्यांवर गंडांतर ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे शहरातील उड्डाणपुलाखालील सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. परंतू काही ठिकाणी पुलाखाली पोलिस चौक्या बांधण्यात आल्याने, महापालिका आणि पोलिस प्रशासनामध्ये विसंवाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाण पुलाखाली पार्किंग व अन्य बांधकामे करू नयेत असे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरही शहरातील अनेक उड्डाण पुलाखाली पार्किंग तसेच बांधकाम करून जागेचा वापर करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखाली ज्या ठिकाणी अतिक्रमणे आहेत, ती काढून टाकण्याचा प्रस्ताव शुक्रवारी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील काही उड्डाण पुलांखाली पोलिस चौक्या बांधल्या आहेत. विशेष करुन गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांनी चौकी बांधली आहे. धायरी येथे देखील पुलाखाली चौकी बांधण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीच्या निर्णयामुळे या चौक्याही हलवाव्या लागणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनामध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com 

You might also like