…म्हणून ‘त्यांनी’ १.७५ एकरांच्या डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राहाता तालुक्यात पाण्याअभावी डाळिंबाची बाग सुकल्याने हतबल झालेल्या शेतक-याने पावणेदोन एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरविले. संपूर्ण डाळिंबाची बाग जमीनदोस्त करण्यात आली.

केलवड येथील सुभाष चांगदेव वाघे या शेतक-याने डाळिंबाची बाग नष्ट केली आहे. सुभाष वाघे यांच्या नावावर ७५ गुंठे क्षेत्र आहे. जवळपास दोन एकर शेती त्यांच्या नावावर आहे. या क्षेत्रात त्यांनी २० गुंठ्यांवर शेततळे बनविले आहे. या वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने केलवड भागात पिण्यासाठीच पाणी नाही. मग बागेसाठी पाणी कुठून आणायचे, अशी भीषण परिस्थिती आहे. सुरुवातीला वाघे यांनी बँकरद्वारे पाणी विकत घेतले. तब्बल ६० हजार रुपये पाण्यावर खर्च केले.

दररोज चार वेळा टँकरद्वारे पाणी आणायचे. मात्र, पावसासाठी अजून महिनाभराचा अवधी आहे. पाण्यासाठी इतका खर्च परवडत नसल्याने वाघे यांच्या अडचणी वाढल्या. यात भर म्हणजे केलवड येथील तलाठी यांनी त्यांच्या शेतात डाळिंबाचा बाग असतानाही त्यांचे शेतात सोयाबिन दाखविले. त्यामुळे त्यांना डाळिंबाचे अनुदान न येता, सोयाबिनचे तुटपुंजे अनुदान आले. या दोन्ही कारणांमुळे दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरविल्याचे सुभाष वाघे यांनी सांगितले.

तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागेवर पाने नाहीशी झाली होती. निव्वळ डाळिंबाच्या काड्याच शिल्लक राहिल्याने वाघे हतबल झाले आणि एक-एक डाळिंबाचे झाड त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.