जिल्हा परिषद रुग्णांच्या पाठीशी ‘सक्षम’ उभी राहणार : प्रमोदकाका काकडे

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – नीरा व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत नेहमीच ज्युबिलंट कंपनीची धडपड असते. ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनने जि.प व ग्रा.पं.च्या मदतीने आरोग्य शिबीर भरविले आहे ते कौतुकास्पद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या आजारांवर उपचार होणार नाहीत त्याकरिता पुढील उपचाराकरिता जिल्हा परिषद रूग्णांच्या पाठीशी सक्षम उभी राहणार असल्याची ग्वाही पुणे जि.प.चे विद्यमान बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांनी नीरा येथे दिली.

नीरा (ता.पुरंदर) येथे ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन, ग्रामपंचायत नीरा-शिवतक्रार व प्राथमिक आरोग्य केंद्र, नीरा यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च ते ५ मार्च दरम्यान भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२) या शिबिराचे उद्घाटन पुणे जि.प.चे विद्यमान बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण होते. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती प्रा.डॉ. गोरखनाथ माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रा.पं.सदस्य दिपक काकडे, विजय शिंदे, रेवती भोसले, ज्युबिलंटचे मनुष्यबळविकास अधिकारी दिपक सोनटक्के, मेंटेनन्स अधिकारी राजेंद्र राघव, ज्युबिलंटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भिसे,ज्युबिलंट कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुरेश कोरडे, फाउंडेशनचे समन्वयक अजय ढगे, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश पवार, डॉ. अश्विनी गाडे, डॉ. सागर डांगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, डॉ. ममता पळसे , डॉ.स्वप्निल रणनवरे यांच्यासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

काकडे म्हणाले कि, आरोग्य शिबिरातील जि.प. मधील आरोग्य कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना मदत केली जाणार आहे. तसेच आशा स्वयंसेविकांना बजेटनंतर नक्कीच गोड बातमी देण्याचा प्रयत्न करणार आहे.

ज्युबिलंटचे उपाध्यक्ष सतीश भट म्हणाले कि, नागरिकांनी दररोज आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून छोटा आजार असतानाच त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरिता ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन व नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले असून नीरा व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ध्ये सहभाग नोंदवून शिबिरातील तज्ञ डॉक्टरांकडून आपल्या तपासण्या करून घ्याव्यात.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय तिडके म्हणाले कि, विविध आजारांच्या माध्यमातून समाजाचे नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी सामाजिक कार्याच्या दृष्टीकोनातून ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन त्यांच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या शिबिरात ब्लड प्रेशर, मधुमेह,विविध प्रकारचे कॅन्सर यासारखे असंसर्गजन्य रोगाच्या तपासणी करिता आरोग्य शिबिरे भरवित आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना दत्ताजीराव चव्हाण म्हणाले कि, निरोगी आरोग्य हा बेस माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे. ६५ टक्के माणसे मानसिक दृष्ट्या दबावाखाली आहेत. याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होत आहे. त्यामुळे मानसिक दुबळेपण येत आहे. ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन आरोग्याच्या बाबतीत जी काळजी घेत आहे तो चांगला उपक्रम आहे.

यावेळी प्रा. डॉ. गोरखनाथ माने, बाळासाहेब भोसले, दिपक काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.