उत्तर प्रदेशात भाजपचा ‘महाराष्ट्र’ फाॅर्मुला ; विरोधकांचा ‘हा’ मुख्य उमेदवारच पळविला

लखनौ : वृत्तसंस्था – समोरच्या पक्षाला चित करायचे असेल तर त्यांच्या प्रमुख खेळाडुला काहीही करुन घेरायचे. काही झाले तरी तो निवडून येणार असे वाटले तर त्यालाच आपल्या पक्षात घेऊन तिकीट द्यायचे आणि पक्षाची आमदार खासदारांची संख्या वाढवायची ही भाजपची महाराष्ट्रातील रणनिती उत्तर प्रदेशात ही वापरली आहे. ही रणनिती वापरण्याची वेळ एकेकाळचा भाजपचा गड आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्याची वेळ आली.
संत कबीरनगरमध्ये भाजपने महाराष्ट्राचा फार्मुला वापरुन समाजवादी पक्षाचे गोरखपूरचे खासदार प्रविण निषाद यांना भाजपात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रविण निषाद यांचा विजय हा देशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. गोरखपूरसारख्या भाजपच्या पारंपारिक मतदार संघात तेही योगी मुख्यमंत्री असताना विरोधकांनी विजय मिळविणे, ही अतिशय महत्वाची गोष्ट ठरली.

समाजवादी व बसप हे एकत्र आले तर भाजपला हरवू शकतात, हे गोरखपूर पोटनिवडणुकीतून देशभरात ठळक झाले. त्यामुळे विरोधक ऐकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातूनच पुढे देशात अनेक राज्यात भाजप विरोधक एकत्र येऊन त्यांनी आघाडी केली आहे.

उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांनी गठबंधन केले आहे. त्यामुळे हदरलेल्या भाजपने थेट त्यांचा उमेदवारच पळविला.

देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा व भाजपचा विजयरथ रोखण्यास कारणीभूत ठरलेले प्रविण निषाद यांनाच भाजपने आपल्याकडे ओढले. त्यांना पक्षात प्रवेश देऊन संत कबीरनगरमधून उमेदवारीही घोषित केली व समाजवादी -बसपा आघाडीवर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाराष्ट्रात त्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या मुलालाच पळवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. तसाच काहीसा प्रकार भाजपने उत्तर प्रदेशात केला आहे.