…तर काँग्रेसच्या ‘या’ 3 मुख्यमंत्र्यांसह प्रियंका गांधींचे नाव काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चर्चेत

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी नावाच्या सुनामी मध्ये  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. एवढेच नाही तर जे काँग्रेसचे बालेकिल्ले  समजल्या जाणाऱ्या मतदार संघात देखील काँग्रेसचा पराभव झाला. ही बाब काँग्रेस करिता  धक्कादायक आहे. त्यामुळेच आज दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीबैठक बोलवण्यात आली होती . या बैठकीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आजाद, पंजाब चे  मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह असे काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वप्रथम काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, पंजाबचे  मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत याची नावे प्रामुख्याने अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी यांचा राजीनामा 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी  मोठी चर्चा होती. काँग्रेसच्या अपयशाकरिता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या बैठकीत नक्की कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा केली गेली. राहुल गांधींचे यांना काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून केवळ दीड वर्षे झाली होती. त्यानंतर लगेच त्यांनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत होते मात्र अखेर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पक्ष राहुल गांधींचा  राजीनामा  स्वीकारणार का ? 

राहुल गांधी यांनी आपल्या पक्षपदाचा राजीनामा दिला खरा पण काँग्रेस पक्ष त्यांचा राजीनामा स्वीकारणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचे देखील समजते आहे. तसेच राहुल गांधी यांचा जर राजीनामा स्वीकारला तर त्यांचे पद नक्की कुणाकडे जाईल याबाबत देखील संभ्रम आहे. मात्र अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी, अमरिंदर सिंह, कमलनाथ, अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळल्या होत्या तर यंदा काँग्रेसला ५२ जागा मिळल्या आहेत. वायनाड मतदार संघात राहुल गांधी विजयी झाले असले तरी त्यांच्या स्वतःच्याच घरात म्हणजेच अमेठी मतदार संघात त्यांचा ५५ हजार मतांनी स्मृती इराणी यांनी पराभव केला.