पालकमंत्री जागा वाटपात ‘बिझी’, जीवनावश्यक वस्तू तातडीने द्या : काँग्रेसची मनपा आयुक्‍तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पूरस्थितीला सत्ताधारीच जबाबदार असून अशा गंभीर परिस्थितीतही पालकमंत्री शिवसेनेसोबत जागा वाटपासाठी दिल्लीत बैठका घेत बसले आहेत, यावरूनच त्यांचे पुणेकरांप्रति प्रेम दिसून येत आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकची यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी आज कॉंग्रेसच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.

कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागुल आणि अविनाश बागवे यांनी आज आंबिल ओढ्याला आलेल्या पूराच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांनी माहिती दिली. शिंदे म्हणाले, घडलेली घटना दुर्देवी आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने अत्यावश्यक साहित्याची मदत उपलब्ध करून द्यावी. स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने कॉंग्रेसने पूरग्रस्तांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतू आणखी मदतीची गरज असल्याने प्रशासनाने प्रयत्न करावे. हवामान खात्याने आणखी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आपत्ती व्यवस्थापनाची अतिरिक्त यंत्रणा तैनात करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

मोहन जोशी म्हणाले, की पुण्यात पूरस्थिती असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुकीच्या कामासाठी दिल्लीत शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चेला गेले आहेत. मूळात सत्ताधार्‍यांना निवडणुकांशिवाय पुणेकरांशी काही देणे घेणे नाही. नागरिकांचे बळी जाण्यास सत्ताधारीच कारणीभूत असून आम्ही त्यांचा निषेध करतो.

Visit : policenama.com