एकतर्फी प्रेमप्रकरणातून वर्षभरापासून तरुणीचा पाठलाग, विनयभंगाच्या गुन्ह्यात 24 तासात आरोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वर्षभरापासून एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीचा पाठलागकरून तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी 24 तासात आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यापूर्वी देखील त्याच्याविरोधात 2 वेळा अदखलपात्र गुन्हे दाखल केले होते.

शाबुद्दीन मुनीर शेख (रा. शास्त्रीनगर, कोथरूड ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख आणि पीडित मुलगी ओळखीचे आहेत. दरम्यान गेल्या एक वर्षांपासून शेख हा तिचा पाठलाग करत होता. त्याचे एकतर्फी प्रेम होते. तरुणी त्याला बोलण्यास तसेच लग्नास नकार देत होती.

दरम्यान तरुणी काम करत असणाऱ्या दुकानात आला. तिचा हात पकडून माझ्यासोबत चल असे म्हणून लग्न करण्याचा तगादा लावला. तरुणीने विरोध केला असता तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी त्याला पकडून आणले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास करून 24 तासात त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपी शेख याने यापूर्वी तरुणीची छेड काढली होती. त्याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात 2 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.